पुणे: सह्याद्री रुग्णालय प्रकरण : अहवाल येतोय… पण जबाबदारी कोण घेणार? “रुग्ण गेले तरी कागद सुटले नाहीत”, समिती आली-गेली, पण दोषी अजून गायब!

2a23200c52f23763ed4a9e336764e82817560020236431075_original.jpg

पुणे : सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू… आणि त्यानंतर सुरु झालेली सरकारी चौकशी. अहो, चौकशी तर जोरदार सुरू आहे, समित्याही बनल्या, बैठकींवर बैठका घेतल्या गेल्या, पण मृत्यूला जबाबदार नेमका कोण? हा प्रश्न अजूनही तसाच अनुत्तरित आहे.

गुरुवारी समितीने रुग्णालयात जाऊन “झाडाझडती” केली. अहवाल चाळले, फाईली उलटल्या-पालटल्या, पण खरी चूक नेमकी कुठे झाली यावर अजूनही ठोस उत्तर नाही. दरम्यान, रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे, म्हणजे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीत गडबड असल्याचं सरकारलाही मान्य आहे.

१५ ऑगस्टला बापू कोमकर आणि २२ ऑगस्टला त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला, पण रुग्णालय मात्र आपल्या बचावासाठी कागदपत्रं सादर करत आहे. एकीकडे जीव गेले, तर दुसरीकडे फाईलींच्या ढिगाऱ्यात सत्य शोधलं जातंय.

समितीचे अध्यक्ष आहेत परदेशी ख्यातीचे डॉ. मोहम्मद रेला. त्यांच्यासोबत सात-सात तज्ज्ञ डॉक्टर. अहो एवढा मोठा ताफा चौकशीसाठी बसवला, पण शेवटी तोही सरकारी अहवाल “या महिन्याच्या अखेरीस”च मिळणार. म्हणजे प्रश्न असा की – एवढं झाल्यावरही सत्य बाहेर येईल का, की हा अहवालही कुठल्या तरी कपाटात धूळ खात पडून राहणार?

रुग्णालयाची गडबड, नातेवाईकांचा आक्रोश आणि सरकारी यंत्रणेची समित्या… अखेर या मृत्यूला जबाबदार कोण, याचं उत्तर अजूनही टांगणीला आहे.

Spread the love