पुणे: ट्रक चालकाला दम देत पोलिस शिपायाकडून १० हजारांची वसुली; तक्रारीनंतर निलंबनाची कारवाई

पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने पोलिसी धाक दाखवत ट्रक चालकाकडून १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापूराव पोपट ढोले असे या पोलिस शिपायाचे नाव असून, त्यांनी १५ एप्रिल रोजी सकाळी खेड शिवापूर बोगद्याजवळ तामिळनाडू येथील (टी.एन.१८ बी.एल. २६५८) क्रमांकाच्या ट्रकला अडवले. ट्रक चालक मोबाईलवर बोलत असल्याचा मुद्दा करत “त्याचे १५ हजार रुपयांचे चालान होईल” असे सांगत ढोले यांनी ट्रक चालक राहुलकुमार शिवनाथ यादव याला आपल्या वाहनात बसवून कायदेशीर कारवाईची भीती दाखवली.
त्यानंतर ढोले यांनी ट्रक चालकासोबत कात्रज रोडवरील एका गॉगल स्टॉलवर नेले. तिथे स्टॉल मालकाच्या माध्यमातून ट्रक चालकाकडून ऑनलाइन पैसे घेऊन रोख स्वरूपात १० हजार रुपये घेतले. या प्रकरणी राहुलकुमार यादव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली.
चौकशीदरम्यान ढोले यांनी आपल्या गैरकृत्याची कबुली देत ट्रक चालकाची माफी मागून १० हजार रुपये परत केले. तरीही हे कृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी ढोले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
या घटनेमुळे पोलिस खात्यातील काही कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या गैरवर्तनावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत.