पुणेकरांची पावसाने पुन्हा एकदा परीक्षा; अनेक रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत

पुणे, २१ मे – मंगळवारी दुपारी पुणे शहरावर मेघांनी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचले आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक रस्त्यांना जलाशयाचे स्वरूप आल्याने पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली.
कोथरूडमधील चांदणी चौक, सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर, माणिकबाग चौक, औंध, आणि पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी पावसामुळे फ्लेक्स आणि होर्डिंग्स कोसळण्याचे प्रकार घडले. धानोरी आणि पोरवाल रस्त्यांवर होर्डिंग कोसळले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सणसवाडी आणि फुरसुंगी येथील मंतरवाडी चौकात देखील होर्डिंग्स कोसळले. पावसाच्या जोरामुळे विमानतळ, कात्रज, हडपसर, धानोरी परिसरात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले आणि ड्रेनेज लाईन स्वच्छ केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत पाणी न वाहता तुंबल्याने त्या दाव्याला छेद बसल्याचे दिसून आले.
कोरेगाव पार्क, महात्मा फुले पेठ, शिवाजीनगर आणि आंबेगाव पठारात झाडांच्या फांद्या कोसळून रस्ते अडथळाग्रस्त झाले. लोहगाव, टिंगरेनगर, सुखसागरनगर भाग २, नऱ्हे, कर्वेनगर, कोथरूड परिसरातील नागरिकांनी पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिकेकडे नोंदवल्या.
पिरंगुट, लवळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. खडकवासल्याजवळील कोंढवे धावडे, एनडीए, उत्तमनगर भागांत पावसाने जोरदार तडाखा दिला.
पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महापालिकेची पथके रस्त्यावर उतरली असून, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी काम सुरू आहे. “पावसाचे पाणी साचणाऱ्या नऊ ठिकाणी अडथळे दूर करण्यात आले आहेत,” अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
दरम्यान, हवामान विभागाने पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारपासून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.