पुणे: महापालिकेत फेरबदल की फेरफार? वादग्रस्त उपायुक्त मुख्य प्रवाहात – ‘नवल’च नवल!

vsrsnews-pune-municipal.jpg

पुणे – पुणे महापालिकेत पुन्हा एकदा प्रशासकीय फेरबदलांचा खेळ रंगला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट केला असून, त्यात वादग्रस्त ठरलेले उपायुक्त माधव जगताप यांना थेट मुख्य प्रवाहात आणल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. ‘दोषींना बक्षीस’ देण्याची ही नवी पद्धत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिल्यांदाच महापालिकेत विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) पदाची निर्मिती करून प्रसाद काटकर यांची नेमणूक करण्यात आली. काटकर हे राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी असून, त्यांच्या ताब्यात निवडणूक विभाग देण्यात आला आहे. या नव्या पदामुळे राजकीय छटा अधिक ठळक झाल्या असून, “ही नेमणूक वादग्रस्त ठरणार” हे समीकरण आधीच पक्कं झालं आहे.

दरम्यान, अतिक्रमण विभागाचे जबाबदार बदलले तरी खरे बदल मात्र कागदावरच. उपायुक्त संदीप खलाटे यांच्याकडे अतिक्रमण विभाग कायम ठेवला गेला आहे. एवढंच नव्हे, तर मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार यांनाही सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग प्रमुख म्हणून नेमण्यात आलं आहे. मात्र ते खलाटे यांच्या अधीन काम करणार म्हणजे “नवे चेहरे, जुनीच चाले”.

वादग्रस्त मुद्द्यांमध्ये जबाबदार ठरलेले माधव जगताप आता पुन्हा मुख्य प्रवाहात – ही बाब सामान्य नागरिकांच्या डोळ्यात खुपतेय. महापालिकेच्या चुका सुधारण्याऐवजी त्याच लोकांना पुन्हा संधी देणे, हे “चुका दुरुस्त न करता त्यांनाच अधिकृत शिक्कामोर्तब देणे” असं स्पष्ट चित्र आहे.

थोडक्यात, पुणेकरांचा सवाल एकच – महापालिकेत फेरबदल होतोय की फेरफार?


Spread the love