पुणे: वडगावशेरीत ‘स्पा’च्या आड वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

पुणे – वडगावशेरी येथील आनंदपार्क परिसरात ‘सृष्टी स्पा’ या मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून, ‘स्पा’चे मॅनेजर व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदननगर पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई वर्षा नामदेव सावंत यांच्या तक्रारीवरून रिया रंजीत शर्मा (वय २१, रा. चंदननगर), स्पा मालक संदिप त्रिपाठी (रा. वडगावशेरी) आणि राहुल जाधव (रा. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खबऱ्याच्या माहितीवरून कारवाई
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील शैलेश पार्क इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या ‘सृष्टी स्पा’मध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार २८ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली.
पैशांच्या आमिषाने वेश्याव्यवसायात ढकलले
तपासादरम्यान समोर आले की, आरोपी रिया शर्मा ही मॅनेजर असून, तिने जास्त पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्रिपाठी व जाधव या दोघांनी या महिलांमार्फत पैसे कमावले होते. पोलिसांनी तिघांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संबंधित ‘स्पा’च्या परवानग्यांचीही चौकशी केली जात आहे. आणखी कोणी या गोरखधंद्यात सामील आहे का, याचाही तपास सुरू आहे.
—