पुणे: हुक्का विक्रीला पोलिसांचे अभय? ९० हजार रुपये घेतल्याप्रकरणी उपनिरीक्षक निलंबित

पुणे : हुक्का पार्लरविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असतानाही काही पोलिस अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर हुक्का व्यवसायांना अभय दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळेपडळ पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शरद निवृत्ती नवले यांच्यावर बेकायदेशीर हुक्का विक्रीस प्रोत्साहन देत ९० हजार रुपयांची प्रोटेक्शन मनी स्वीकारल्याचा आरोप असून, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केली असून नवले यांनी महंमदवाडीतील बीबीसी रुफटॉप किचन अँड बारमधील हुक्का विक्रीस परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. या हॉटेलवर पूर्वी पोलिस आणि गुन्हे शाखेने धाड टाकली असता १६ टेबलांवर ५७ तरुण-तरुणी हुक्का ओढत असल्याचे आढळून आले होते.
हॉटेल मालक पार्थ अनिल वाल्हेकर याने चौकशीदरम्यान सांगितले की, एप्रिल २०२५ पासून हुक्का विक्री सुरू झाली होती आणि त्यासाठी नवले यांना रोख ६० हजार रुपये आणि ओळखीच्या हनुमंत गायकवाड पाटील यांच्या माध्यमातून ३० हजार रुपये ऑनलाइन दिले होते. एकूण ९० हजार रुपयांची रक्कम नवले यांनी स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागळली असून, यापूर्वीही वानवडी पोलिस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांना हुक्का प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. तरीही धडा न घेतल्याचे दिसून येते. पोलिस आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानंतर देखील काही पोलीस कर्मचारी हुक्का व्यवसायांशी संगनमत करत असल्याचे चिंताजनक वास्तव पुढे आले आहे.
पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.