पुणे: शिवाजीनगरमधील गंधर्व लॉजवर पोलिसांचा छापा: परदेशी चलनासह ६ लाखांचा ऐवज जप्त; प्रतिष्ठित व्यक्तींसह आरोपींना अटक

पुणे: शिवाजीनगर येथील गंधर्व लॉजमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ जणांना ताब्यात घेतले. जुगार खेळणाऱ्या या व्यक्तींकडून परदेशी चलन, भारतीय रोख रक्कम, व जुगाराचे साहित्य असा ६ लाख ३७ हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या छाप्यात हॉटेल मालक शेट्टी व चालक सचिन मेश्राम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळण्यासाठी हॉटेलची खोली उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्ती:
1. गौरव संपत राठोड (वय २९, रा. गंगाधाम मार्केटयार्ड)
2. हरिश फुटरमल सोलंकी (वय ५४, रा. कोर्णाक प्लस, सोपान बाग)
3. रितेश जयंतीलाल ओसवाल (वय ३४, रा. राजलक्ष्मी सोसायटी, मार्केटयार्ड)
4. पराग आनंदराव मुथा (वय ४१, रा. गगनविहार, मार्केटयार्ड)
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सचिन जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गंधर्व लॉजमधील पहिल्या मजल्यावर जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.
तिर्रट जुगाराचा पर्दाफाश
छाप्यादरम्यान आरोपी पत्त्यांसह ‘तिर्रट’ नावाचा तीन पत्ती जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून प्लॅस्टिकच्या रंगीत कॉईन्स देखील जप्त करण्यात आल्या. हिरव्या रंगाच्या कॉईनची किंमत २० रुपये, लाल रंगाच्या १०० रुपये आणि काळ्या रंगाच्या कॉईनची किंमत १ हजार रुपये असल्याचे तपासात उघड झाले.
या सर्वांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पुढील तपास करत आहेत.