पुणे: पोलीस हवालदार बेपत्ता; पोलीस निरीक्षकावर जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप

इंदापूर, पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे मंगळवारी (१० जून) पहाटेपासून आपल्या शासकीय निवासस्थानातून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
चिठ्ठीत केले गंभीर आरोप
केमदारणे यांनी बेपत्ता होण्याआधी आपल्या पत्नीच्या मोबाईलवर एक चिठ्ठी व कॉल रेकॉर्डिंग पाठवले. या चिठ्ठीत त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे, हवालदार रासकर आणि पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. “मागील दोन महिन्यांपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन, असे शब्द वापरले गेले,” असा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे.
पत्नीचा थेट इशारा : न्याय न मिळाल्यास आत्महत्या
केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देताना सांगितले की, “खात्याबाहेर का धमकावलं जात होतं? माझ्या पतीला न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा मी माझ्या मुलांसह पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करीन,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
कॉल रेकॉर्डिंग व चिठ्ठीच्या आधारे चौकशीची मागणी
केमदारणे यांनी पाठवलेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकी कोणती माहिती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याआधारे वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. घरातील ड्रॉवरमध्ये देखील त्यांनी लिहिलेली तीच चिठ्ठी सापडल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.
पदभार न स्विकारता मानसिक तणाव?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी केमदारणे यांची बदली इंदापूरहून भिगवण पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र त्यांनी तिकडे पदभार स्वीकारलेला नव्हता. हा तणावच त्यांच्या बेपत्तेपणामागे असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलीस विभागाकडे होत आहे. केमदारणे सुरक्षित सापडावेत आणि त्यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.