पुणे: अनधिकृत फ्लेक्सबाजीवर पालिकेचा बडगा की ‘राजकीय आशीर्वाद’चं आवरण?
अधिकारी रस्त्यावर उतरले, पण राजकीय बॅनर मात्र अजूनही ‘अस्पर्श’!

पुणे : शहरातील प्रत्येक चौकात, भिंतींवर, विद्युत खांबांवर आणि सिग्नलजवळ उभारलेले फ्लेक्स आणि बॅनर नागरिकांच्या डोळ्यात अक्षरशः खुपत आहेत. “अनधिकृत फ्लेक्सबाजी थांबवा” असे आदेश देत पुणे महापालिकेने कडक कारवाईचा इशारा दिला असला तरी, राजकीय फ्लेक्सना मिळणारे अभय अजूनही तसंच कायम असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी माहिती दिल्यानुसार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार दररोज किमान पाच गुन्हे दाखल करणे आणि फ्लेक्स सांगाडे तोडून टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु वास्तव चित्र मात्र वेगळं — काही ठिकाणी महापालिका कर्मचारी फ्लेक्स काढत असताना, काही मिनिटांतच त्याच ठिकाणी नवे राजकीय पोस्टर उभे राहत आहेत.
शहरातील वाढदिवस, स्वागत, निवड, नियुक्ती किंवा उत्सवांच्या निमित्ताने लावले जाणारे फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी धोकादायकरीत्या टांगले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, अपघातांचा धोका वाढतो, आणि शहराचं सौंदर्य नष्ट होतं. तरीही राजकीय नेत्यांचे फ्लेक्स मात्र ‘स्पर्श करू नका’ या सूचनेसह अभेद्य ठरत आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागांकडून कारवाई होत असली तरी ‘राजकीय दबावामुळे’ ही कारवाई बहुतेक वेळा अर्धवटच राहते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काही ठिकाणी अधिकारी स्वतः कारवाईसाठी रस्त्यावर उतरले असले तरी, त्यांचा ‘नजरेआड’ काही फ्लेक्स मात्र अजूनही उभेच आहेत.
“कारवाई केवळ फोटोसाठी आणि अहवालासाठी होते. पण शहरात फिराल तर प्रत्येक सिग्नलवर बॅनरचं राज्य दिसेल,” असा नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांशी महापालिका बैठक घेणार आहे. प्रत्येक फ्लेक्सवर प्रिंटरचे नाव व पत्ता नमूद करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून, त्याद्वारे जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र, राजकीय फ्लेक्सना ‘सूट’ देणं बंद न झाल्यास हे नियम केवळ कागदावरच राहतील, अशी टीका शहरातील नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
“महापालिकेची मोहीम स्वागतार्ह आहे, पण ती निष्पक्ष व्हायला हवी. नाहीतर फ्लेक्सबाजीचे मूळ ‘राजकीय आशीर्वाद’ कधीच उपटले जाणार नाही,”
— नागरिकांचा संतप्त सवाल.