पुणे: मॉडर्न कॉलेजने विद्यार्थ्याचे आरोप फेटाळले; “जातीय भेदभाव नाही, वागणुकीच्या आधारे घेतला निर्णय” – प्राचार्य डॉ. एकबोटे
पुणे | प्रतिनिधी
शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कडून प्रमाणपत्र न दिल्यामुळे लंडनमधील नोकरी गमावल्याचा आरोप करणाऱ्या माजी विद्यार्थ्याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत महाविद्यालयावर जातीय भेदभावाचा आरोप केला होता. या प्रकरणावर आता महाविद्यालय प्रशासनाने भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याने खोटा प्रचार करून बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
प्रेम बिहाडे या विद्यार्थ्याने २०२० ते २०२४ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने लंडनमधील एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. संबंधित कंपनीने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महाविद्यालयाशी ई-मेलद्वारे संपर्क साधला होता. मात्र, या ई-मेलला प्रतिसाद न दिल्याचा दावा करत बिहाडेने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यात महाविद्यालयावर जातीय भेदभाव आणि प्रमाणपत्र नाकारल्याचा आरोप करण्यात आला होता.
यावर प्रतिक्रिया देताना प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “महाविद्यालयात कधीही जातीय भेदभाव होत नाही. विद्यार्थ्याच्या वागणुकीच्या आधारे निर्णय घेण्यात आला होता. प्रेम बिहाडे याला पूर्वी तीन वेळा शिफारसपत्र आणि बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, शिस्तभंग आणि गैरवर्तनाच्या कारणामुळे पुढील प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेण्यात आला.”
डॉ. एकबोटे यांनी पुढे सांगितले की, “१४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित प्रमाणपत्र विद्यार्थ्याला देण्यात आले होते. तरीही तो सोशल मीडियावर खोटा प्रचार करत आहे. या प्रकरणामुळे महाविद्यालय आणि प्राध्यापकांच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे.”
महाविद्यालय प्रशासनाने प्रेम बिहाडेविरुद्ध सायबर कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे शैक्षणिक संस्थांची सामाजिक जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे महत्त्व आणि सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या आरोपांच्या गंभीरतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.