पुणे: येरवडा पोस्ट ऑफिसमधील भोंगळ कारभार: नियमांचं उल्लंघन आणि बेफिकिरीचा कळस!

IMG_20250506_105100.jpg

पुणे, येरवडा – येरवडा पोस्ट ऑफिसमध्ये सध्या सुरु असलेला भोंगळ कारभार नागरिकांच्या आणि सेवाभावी यंत्रणांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. कार्यालयातील शिस्तभंग, नियमांची पायमल्ली आणि पोस्टल सेवा देण्यातील हलगर्जीपणा यामुळे येथील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तीन दिवसापासून येरवडा पोस्ट ऑफिसची आधार सेवाच बंद व येरवडा पोस्ट ऑफिसमधील बहुतांश कर्मचारी ड्युटीवर असतानाही आयडी कार्ड न घालता काम करताना दिसतात. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र लावणे बंधनकारक असतानाही याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

याव्यतिरिक्त, याठिकाणी कायमस्वरूपी पोस्टमन असतानाही, पोस्ट वितरणासाठी बाहेरून रोजंदारीवर व्यक्ती नेमण्यात येत आहेत. हे रोजंदारीवरील व्यक्ती रजिस्टर, स्पीड पोस्ट व इतर महत्वाची पत्रे वाटप करत असून, हा प्रकार बेकायदेशीर आहे. अधिक चिंताजनक बाब म्हणजे, या व्यक्ती स्वतःच्या खर्चाने काम करत असल्याने, त्यामागे आर्थिक देवाण-घेवाणीचा संशय निर्माण झाला आहे.

नागरिकांनी तक्रार केली आहे की, टपाल व आधार कार्ड यासारखी महत्त्वाची कागदपत्रे वितरीत न करता, ती अन्य मार्गाने विल्हेवाट लावण्यात येतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्या महत्वाच्या पत्रांचा मागमूस लागत नाही.

तसेच, एजंट थेट ट्रेझरी विभागात प्रवेश करून काम करत असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट सुरक्षा व्यवस्थेला गंभीर धक्का पोहोचवणारी आहे.

या सर्व गोंधळात पोस्ट मास्तर यांचे कोणत्याही कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत येरवडा पोस्ट ऑफिसमध्ये शिस्त आणि कार्यक्षमतेचा अभाव असून, नागरिकांची विश्वासार्हता कमी होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Spread the love

You may have missed