पुणे: एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या; सात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोग्य विभागाची कारवाई
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील क्षेत्रीय व परिमंडळ वैद्यकीय अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये दि. १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखेर आरोग्य विभागाने तडीने कारवाई करत सोमवारी (दि. १५) सात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मात्र, परिमंडळ कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या ‘तांत्रिक कारणांमुळे’ सध्या रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागातील काही अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेत बदल्यांची प्रक्रिया राबवली आहे. आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमधील सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे :
डॉ. प्रेमलता घाटे – औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय
डॉ. गणेश डमाळे – वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
डॉ. अंजली टिळेकर – कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय
डॉ. मृणालिनी कोलते – बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
डॉ. अरुणा तारडे – सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
डॉ. गोपाळ उजवणकर – घोले रोड, शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय
डॉ. आसाराम काकडे – कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय
अनेक वर्षांपासून क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यानुसार शहरातील सात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या, तरी परिमंडळ स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना व पदोन्नतीबाबतचा प्रशासकीय निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या बदल्यांचा निर्णय सध्या प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
“परिमंडळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना व पदोन्नतीबाबतचा प्रशासकीय निर्णय झाल्यानंतरच त्यांच्या बदल्या करण्यात येतील,” असे आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी स्पष्ट केले.