पुणे: मकोका – पोलिसांचं अस्त्र की गुन्हेगारांचं वरदान? पाच वर्षांत 700 आरोपी तुरुंगात; 400 नवगुन्हेगारांनी घेतली ‘क्रिमिनल ट्रेनिंग’

पुणे – गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी आणलेला मकोका कायदा (Mcoca Act) आता उलटाच पोलिसांवर फिरकतोय की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. “गुन्हा केला की लाव मकोका” हीच पद्धत गेल्या काही वर्षांत रूढ झाल्याने, गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी गुन्हेगारांची संख्या आणि धाडस दोन्ही वाढताना दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांत पुण्यात जवळपास 300 प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात आला. या कारवाईतून 700 हून अधिक आरोपी तुरुंगात गेले. ऐकायला कडक कारवाई वाटली, पण खरी स्थिती वेगळीच आहे. कारण यातील जवळपास 400 आरोपी हे 18 ते 21 वयोगटातील नवगुन्हेगार होते. म्हणजेच, तुरुंगात जाण्याऐवजी सुधारगृहात जाणे ज्यांना अपेक्षित होते, त्यांनाच थेट “कुख्यात गुन्हेगारांची क्लासरूम” मिळाली.
परिणाम? सुधारण्याऐवजी हे तरुण अधिक धारदार बनून बाहेर पडले. तुरुंगातून सुटल्यावर “मकोका रिटर्न” हीच त्यांची ओळख बनली. गुन्हेगारी हा छंद न राहता प्रतिष्ठेचा विषय ठरला. अनेकांनी तर स्वतःच्या टोळ्या सुरू केल्या.
आज पुण्यात 11 मुख्य टोळ्यांसोबत तब्बल 80 लहान टोळ्या सक्रिय आहेत. रस्त्यावर दहशत पसरवणे, दुकानदारांना धमक्या देणे, कॉलेजसमोर गोंधळ घालणे, टोळीयुद्ध करणे – हेच त्यांचे रोजचे धंदे झाले आहेत. व्यापारी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्या मनात भीतीचे सावट वाढते आहे.
पोलिसांनी ज्या अस्त्राने संघटित गुन्हेगारी मोडून काढायची होती, त्याच अस्त्रामुळे रस्त्यावर टोळ्यांचा पूर आला आहे. ‘मकोका’च्या नावाखाली तुरुंगात ढकललेले तरुण बाहेर येऊन नवे सरदार बनलेत. गुन्हेगारीवर मात करण्याऐवजी तीच पोसण्याचं काम झालं, हे कटू वास्तव आहे.
थोडक्यात, पुण्यातली परिस्थिती अशी की – “पोलिसांनी मकोका लावला, पण गुन्हेगारांनी तोच आपल्या ब्रँडिंगसाठी वापरला!”
—