पुणे: आयुक्त बंगल्यातून लाखोंचे साहित्य गायब; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0
IMG_20250806_114641.jpg

पुणे | प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या आयुक्त बंगल्यातून एसी, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही अशा लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसली तरी प्रशासनाने नव्याने सुमारे २० लाख रुपये खर्च करून साहित्य खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मॉडेल कॉलनीतील सुमारे अर्धा एकर परिसरात असलेल्या आयुक्तांच्या अधिकृत बंगल्यातून महत्त्वाचे साहित्य गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या बंगल्याच्या परिसरात सीसीटीव्ही तसेच २४ तास सुरक्षा रक्षक असतानाही हा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बंगल्यात यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले वास्तव्यास होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांच्या वास्तव्यापूर्वी बंगला पूर्ववत करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी पाहणी केली. या पाहणीत चार एसी, झुंबर, पितळी दिवे, दोन एलईडी टीव्ही, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट, किचन टॉप, रिमोट बेल्स आणि ॲक्वागार्ड यांसह अनेक वस्तू बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे या वस्तू कोणत्या कालावधीत आणि कशा प्रकारे गायब झाल्या, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. इतक्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडणे म्हणजेच व्यवस्थेतील गंभीर त्रुटी असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीच्या बाबतीत सध्या सावळा गोंधळ दिसून येतो. मालमत्ता विभाग, भवन विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्यात बंगल्याच्या ताब्याबाबत स्पष्टता नसल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, हे प्रकरण गुप्त ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही समजते. याआधीही घोले रस्त्यावर असलेल्या महापौर बंगल्यातून एलईडी टीव्ही चोरीला गेला होता आणि याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील चोर अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे आयुक्त बंगल्याची चोरीची घटना ही शहरातील दुसरी मोठी घटना ठरत आहे.

प्रशासनाकडून आता नव्याने २० लाखांचे साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल होणार की नाही आणि जबाबदार कोण, हे समोर येणे बाकी आहे.


Spread the love

Leave a Reply