पुणे: रॅगिंगप्रकरणी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये मोठी कारवाई : तीन निवासी डॉक्टर बडतर्फ, डॉ. गिरीश बारटक्के विभागप्रमुखांची उचलबांगडी

पुणे : बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या रॅगिंग प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, कॉलेज प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. ऑर्थोपेडिक्स विभागातील तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांना बडतर्फ करण्यात आले असून, त्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या या संस्थेत सोमवारी रॅगिंगची घटना उघडकीस आली. एका कनिष्ठ निवासी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनंतर मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक घेण्यात आली. प्रारंभिक चौकशीत दोष आढळल्याने तातडीने संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणावर अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले की, तक्रार एका विद्यार्थ्याच्या आईकडून आली असून, गेल्या ८ ते १० दिवसांपासून रॅगिंग सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. “तक्रारीची सखोल शहानिशा केली जात आहे. मात्र, ओरडणे व शिवीगाळ करणे म्हणजे थेट रॅगिंग नव्हे,” असे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर डॉ. बारटक्के यांच्याकडील ऑर्थोपेडिक्स विभागप्रमुखपदाचा कार्यभार तात्पुरता काढून घेण्यात आला असून, तो डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. उपअधिष्ठातापदाची जबाबदारी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे देण्यात आली आहे.
कॉलेज प्रशासनाने १५ ते २० डॉक्टरांची अँटी रॅगिंग समिती स्थापन केली असून, सात दिवसांत या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.