पुणे: सह्याद्री रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती; उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली

0
Untitled-design-13-1-1536x864.jpeg

पुणे : डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. चौकशी अहवाल येईपर्यंत रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना तातडीने स्थगिती देण्यात आली आहे.

रुग्ण बापू कोमकर यांचा मृत्यू १५ ऑगस्ट रोजी झाला होता, तर दाता असलेल्या पत्नी कामिनी कोमकर यांचे निधन २२ ऑगस्ट रोजी झाले. नातेवाइकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य सल्लागार समितीच्या बैठकीत चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती चार आठवड्यांत अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सांगितले की, चौकशी सुरू असताना सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येणार नाहीत. याआधी आरोग्य विभागाकडून रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली होती. प्रत्यारोपणानंतर झालेल्या मृत्यूची माहिती वेळेत न दिल्याबद्दल रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता.

सह्याद्री रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांकडून नोटीस मिळाली असून आम्ही चौकशीस पूर्ण सहकार्य करत आहोत. चौकशीचा भाग म्हणून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र इतर सर्व वैद्यकीय सेवा व शस्त्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू राहतील.”

Spread the love

Leave a Reply