पुणे: भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडून ५० लाखांच्या लाचेची मागणीः येरवड्यातील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; व्यावसायिकाला धमकी दिल्याचा आरोप

पुणे : हडपसर येथील जमिनीच्या मोजणीसाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कुणाल अष्टेकर (वय ४१, रा. शिवाजीनगर, पुणे) या व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या जमिनींची मोजणी 2023 व 2024 मध्ये शासकीय शुल्क भरून कायदेशीर पद्धतीने करण्यात आली होती. मात्र, संबंधित कामात अडथळा आणत पाटील आणि येटोळे यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती.
यामध्ये आरोपी किरण येटोळे यांनी लाचीत तडजोड करत २५ लाख रुपयांची मागणी केली होती. “२५ लाख न दिल्यास मालमत्तेचे नुकसान होईल,” अशी धमकीही त्यांनी तक्रारदाराला दिली होती. इतकेच नव्हे तर, अमरसिंह पाटील यांचे नाव घेत “ते हेलिकॉप्टर शॉट लावतील” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांच्या निर्देशानुसार खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर आरोपींनी चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 308(2), 198, 201 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त एम. खाडे करत आहेत.