पुणे: ससूनमध्ये उपचाराअभावी कातकरी तरुणाचा मृत्यू: सरकारी रुग्णसेवेचा बोंब! – व्हिडिओ

पुणे : पुन्हा एकदा ससून जनरल हॉस्पिटलची काळी बाजू उघड झाली आहे. कातकरी समाजातील २७ वर्षीय अनिल वाघमारे यांचा उपचाराअभावी रुग्णालयाच्या जमिनीवर तडफडत मृत्यू झाला. दोन तास वेदनेने विव्हळणाऱ्या या तरुणाला वैद्यकीय मदत मिळाली नाही, हीच सरकारी रुग्णालयांची खरी ओळख आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पहा व्हिडिओ
मृताची आई विमल वाघमारे यांनी हंबरडा फोडला – “माझा मुलगा समोर तडफडत मरत होता, पण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काहीच फरक पडला नाही. गरीब आहोत म्हणून आम्हाला दुर्लक्ष मिळाले.”
नातेवाईकांनीही आरोप केला की गरीबांसाठी सरकारी रुग्णालय म्हणजे “मरणाची वाट पाहण्याची जागा”. दारूचे व्यसन आणि डायलिसिसची गरज या कारणांवर रुग्णालयाने बोट ठेवले, पण उपचार मात्र मिळालेच नाहीत.
दरम्यान, या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांत संताप आहे. “रुग्णालय म्हणजे रुग्णांचा आधार की थेट स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग?” असा टोमणा त्यांनी मारला.
सरकारी रुग्णालयांमधील निष्काळजीपणा, ढिसाळ व्यवस्था आणि गरीब जनतेला मिळणारा अपमानजनक अनुभव पुन्हा एकदा समोर आला आहे. जबाबदारांवर कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे चौकशीच्या नावाखाली हा प्रकार धुळीत मिळणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
—