पुणे: खाटा वाढवल्याचा नुसताच ’गाजावाजा’; प्रत्यक्षात बेड कार्यान्वित नाहीत; ऑक्सिजनसह खाटा बसविल्या, पण डॉक्टर-नर्स कुठे?

पुणे – महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेची ‘बेडशीट’ बाहेर आली आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नोटीस बजावल्यानंतर घाईगडबडीत कमला नेहरू रुग्णालयात तब्बल 100 खाटा वाढवल्याचा गाजावाजा करण्यात आला. पण गंमत अशी की या खाटा अजून रुग्णांसाठी वापरातच आलेल्या नाहीत.
रुग्णालयात एकूण 420 खाटा असताना, मनुष्यबळाचा अभाव आणि अर्धवट कामामुळे नव्याने बसवलेल्या खाटा फक्त आकडेवारीतच दिसत आहेत. प्रत्यक्षात रुग्णांना त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे ‘खाटा वाढवल्या’ हे बोलण्यापुरतेच, पण त्यावर उपचार घेणारा रुग्ण कुठे आहे, हा प्रश्न कायमच अनुत्तरित!
मागील वर्षीच पाच महत्त्वाच्या महापालिका रुग्णालयांचे अद्ययावत करण्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले होते. त्यात मोड्युलर ऑपरेशन थिएटरपासून खाटा वाढवण्यापर्यंत सर्व घोषणा झाल्या. पण जाहीरातींच्या फुशारक्यांपलीकडे प्रत्यक्ष अमंलबजावणीचा फुगा मात्र रिकामाच राहिला.
एनएमसीने स्पष्ट आदेश दिले होते की रुग्णालयात खाटा वाढवाव्यात, रुग्णसंख्या वाढवावी. त्यासाठी काही मजल्यावरील मोकळ्या जागांवर बेड ठेवले गेले. काही बेड तर ऑक्सिजनसह तयार करण्यात आलेत म्हणे! पण, मनुष्यबळाशिवाय आणि वैद्यकीय सोयीशिवाय हे सगळे बेड फक्त शोभेची वस्तू ठरत आहेत.
अधिकारी मात्र नेहमीसारखे आश्वासनांच्या गोळ्या देत आहेत.
“100 खाटा वाढवल्या आहेत. काही दिवसांत सुरू होणार आहेत,” अशी खात्री अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी दिली.
“मनुष्यबळाची मागणी केली आहे. खाटा लवकरच कार्यान्वित होतील,” असे आरोग्यप्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.
मात्र नागरिकांचा सवाल वेगळाच आहे – “रुग्णालये आधीच डॉक्टर-नर्सच्या टंचाईने ग्रासली आहेत, मग या नव्या खाटांवर कोण बसणार? रुग्ण की पुन्हा एखादी समिती?”
एकूण हिशेब असा की महापालिकेने ‘खाटा वाढवल्या’ हे शीर्षक मोठ्या ढोल-ताशाने वाजवले, पण आतली खोली अजूनही रिकामीच आहे.