पुणे: फुकट चपलांसाठी मायलेकींचा ‘आयपीएस’ प्रताप! एम.जी. रोडवरील नामांकित दुकानात बनावट ओळखपत्र दाखवून १७ हजारांचा माल लंपास; लष्कर पोलिसांनी दोघींना जेरबंद केलं

0
n68393782617597317305338aac67fc7ae74a426791ff230222ac944356821f770a3b3ff5581c9ebb15de52.jpg

पुणे – आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून फुकट चपला उचलण्याचा ‘फसवी’ डाव खेळणाऱ्या दोन मायलेकी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. पुण्यातील एम.जी. रोडवरील नामांकित चप्पल दुकानात या दोघींनी तब्बल १७ हजार रुपयांचा माल घेतला आणि पैसे न देता पसार झाल्या. अखेर लष्कर पोलिसांनी सापळा रचून दोघींना अटक केली आहे.

अटक झालेल्यांमध्ये मिनाज मुर्तजा शेख (वय ४०) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय १९, रा. कोंढवा) यांचा समावेश आहे. पोलिस तपासात उघड झालं आहे की, या दोघींविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात याआधी तीन फसवणुकीचे गुन्हे आधीच नोंद आहेत.

बनावट ओळखपत्रावर विश्वास संपादन

१३ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास मिनाज शेख आणि तिची मुलगी रिबा या एम.जी. रोडवरील प्रसिद्ध चप्पल दुकानात गेल्या. मिनाजने स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणून ओळख दिली आणि बनावट ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगत तिने मोठ्या प्रमाणावर बुट आणि चप्पलांची खरेदी सुरू केली.

संपूर्ण खरेदी झाल्यानंतर मिनाजने दुकानातील कामगाराला “पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल” असं सांगून दोघींनी तिथून थेट पळ काढला. १७ हजारांचा माल घेऊन त्या पसार झाल्या.

सीसीटीव्हीवरून उघड झाला फसवा खेळ

दुकानदाराने तक्रार दाखल केल्यानंतर लष्कर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. फुटेजमध्ये दोघींच्या हालचाली स्पष्ट दिसल्या. तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी १ आणि २ ऑक्टोबर रोजी दोघींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आधीही केले फसवे प्रकार

तपासात समोर आलं आहे की या मायलेकींनी यापूर्वीही शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे दुकानदारांची फसवणूक केली आहे. बनावट अधिकारी बनून विश्वास जिंकणे आणि माल उचलून पसार होणे, ही त्यांची नेहमीची पद्धत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लष्कर पोलिस ठाण्याचे अधिकारी सांगतात, “या महिला अत्यंत चलाखपणे सरकारी अधिकाऱ्यांची ओळख सादर करतात. व्यापाऱ्यांनी अशा बनावट ओळखीच्या लोकांपासून सावध राहावं.”

या प्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलिस करत असून, आरोपींनी आणखी कुठे अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed