पुणे: नववर्षाच्या स्वागताऐवजी विमाननगरात दहशतीचा ‘हॅपी न्यू इयर’! व्हिडिओ
पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री आनंद, जल्लोष आणि सुरक्षिततेचा गजर अपेक्षित असताना, विमाननगरच्या सीसीडी चौकात मात्र गुंडगिरीने कहर केला. शुल्लक कारणावरून टोळक्याने काही विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामध्ये दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
पहा व्हिडिओ
विशेष म्हणजे हा प्रकार एखाद्या दुर्गम भागात नव्हे, तर शहरातील वर्दळीच्या सीसीडी चौकात घडला. इतकेच नव्हे, तर दोन दिवसांत सलग भांडणाच्या घटना घडूनही पोलिसांची उपस्थिती केवळ ‘नंतर पाहू’ या भूमिकेत अडकलेली दिसते आहे. त्यामुळे “पोलीस बंदोबस्त कागदावरच आहे का?” असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
NN360 मराठी ने दिलेल्या वृत्तानुसार, सीसीडी चौकात सुरू असलेली ही गुंडगिरी पाहता, विद्यार्थ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री तर सोडाच, दिवसा देखील या भागातून जाताना धास्ती वाटत असल्याचे नागरिक उघडपणे सांगत आहेत. तरीही या संवेदनशील परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त का नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
सलग घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे विमाननगर ‘हॉटस्पॉट’ ठरत असताना, प्रशासन मात्र निवांत असल्याचे चित्र आहे. “घटना घडल्यावर चौकशी आणि निवेदन देऊन विषय संपवायचा का?” असा टोमणा आता नागरिकांकडून मारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, या भागात तातडीने कडक पोलीस बंदोबस्त, नियमित गस्त आणि दोषींवर कठोर कारवाईची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अन्यथा, नववर्षाच्या शुभेच्छा देणारे हे चौक लवकरच दहशतीचे केंद्र बनतील, यात शंका नाही.