पुणे पोलिसांची कारवाई: दोन मसाज सेंटरवर छापा, देहविक्रीचा पर्दाफाश

पुणे : शहरातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्याचा पर्दाफाश करत स्वारगेट परिसरात पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्रीस प्रवृत्त केले जात असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र ठिकाणी धाड टाकली.
पहा व्हिडिओ
पहिली कारवाई मार्केट यार्ड येथील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर येथे करण्यात आली. येथे सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार महिलांची सुटका केली, तर छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक केली.
दुसरी कारवाई मुकुंदनगर भागातील दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर येथे करण्यात आली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून पोलिसांनी छापा मारला असता, एका महिलेची सुटका झाली आणि 38 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.
या दोन्ही कारवाईमुळे पुण्यात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेट्सना मोठा धक्का बसला असून, पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
—