पुणे: गुन्हे कमी की आकडे ‘स्मार्ट’? पुणे पोलिसांच्या १५ टक्के घट दाव्यावर प्रश्नचिन्ह
पुणे, दि. ३० : “पुणे शहर अधिक सुरक्षित झाले आहे,” असा दावा करत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर गुन्ह्यांमध्ये १५ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात शहरातील नागरिकांना जाणवणारी असुरक्षितता आणि पोलिसांच्या दाव्यांतील तफावत यामुळे या ‘यशकथेवर’ अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.
२५ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुण्यात दरमहा होणाऱ्या खुनांचे प्रमाण ८.३ वरून ६.५ पर्यंत घसरल्याचा दावा करण्यात आला आहे. खुनाच्या प्रयत्नांमध्येही १५ टक्क्यांची घट झाल्याचे सांगण्यात आले. मात्र गुन्हे कमी झाले की केवळ नोंदी कमी दाखवण्यात आल्या, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पोलिस प्रशासनाने या यशाचे श्रेय थेट स्मार्ट सिटी प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्वेक्षण आणि तंत्रज्ञानाधारित गस्त यांना दिले आहे. शहरातील “महत्त्वाच्या ठिकाणी” अधिक गस्त वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येते. पण मग प्रश्न असा आहे की,
गुन्हे खरोखर कमी झाले असते, तर हद्दपार गुंड शहरात मोकाट कसे?
रात्री-अपरात्री महिलांची असुरक्षितता का कायम?
आणि अवैध धंदे ‘दिसत नसल्यासारखे’ का चालू?
“तंत्रज्ञानामुळे गुन्हे रोखण्यात मदत झाली,” असे आयुक्त सांगतात. मात्र सीसीटीव्ही असतानाही गुन्हेगार फरार होतात, ड्रोन असूनही अवैध धंदे ‘उडत्या नजरेतून’ सुटतात, हे वास्तव आकडेवारीत का दिसत नाही, असा सवाल उपस्थित होतो.
दरम्यान, २०२६ मध्ये आणखी आधुनिक गस्त यंत्रणा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानासह स्वतंत्र पोलीस दल, जनजागृती उपक्रम आणि नागरिक-पोलीस संवाद वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे —
आजपर्यंतच्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या का?
२०२५ हे वर्ष पुणे पोलिसांसाठी ‘महत्त्वाचे टप्पा’ ठरल्याचे सांगितले जात असले, तरी शहरातील अनेक भागांत गुन्हेगारी, दहशत, अवैध धंदे आणि पोलिसांच्या निवडक कारवायांचा अनुभव नागरिकांना वेगळेच चित्र दाखवतो.
गुन्हेगारी प्रत्यक्षात कमी झाली आहे की केवळ आकडेवारी ‘स्मार्ट’ करण्यात आली आहे, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत, पुणे शहर खरोखर सुरक्षित झाले आहे का, की फक्त सुरक्षित असल्याचा देखावा उभा केला जात आहे, हा प्रश्न कायम राहणार आहे.