पुणे: ८ सप्टेंबरला राज्यभर शासकीय सुट्टी? सीएम फडणवीस घेणार निर्णय
पुणे : महाराष्ट्रात येत्या आठवड्यात नागरिकांना आणखी एका शासकीय सुट्टीची संधी मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली असून ८ सप्टेंबरला संपूर्ण राज्यात सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या महिन्यात ५ सप्टेंबर रोजी पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ईद-ए-मिलादुन नबी’चा जुलूस काढण्यात येणार होता. मात्र, अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर रोजी असल्याने हिंदू-मुस्लिम एकोपा जपण्यासाठी जुलूसाची तारीख बदलण्यात आली आहे. अखेरीस ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या बैठकीत सर्वसंमतीने हा जुलूस ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ८ सप्टेंबरला राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. यामुळे सर्वांना या धार्मिक सोहळ्यात सहभागी होता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात मागील महिन्यात नारळी पौर्णिमा आणि दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे आता ८ सप्टेंबरला अतिरिक्त सुट्टी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतल्यास सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर होऊ शकते.
ठळक मुद्दे :
५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबरला ‘ईद-ए-मिलादुन नबी’चा जुलूस
हिंदू-मुस्लिम एकोपा जपण्यासाठी घेतला निर्णय
आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे सुट्टीची मागणी
निर्णय झाला तर सोमवारी राज्यभर सुट्टी