पुणे: घरगुती सिलिंडरमध्ये गॅस कमी! वैध मापन शास्त्र विभागाची धडक कारवाई;
कोरेगाव पार्क व वनाज परिसरातील वितरकांवर दंडात्मक कारवाई
पुणे, प्रतिनिधी : शहरातील घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कमी वजनाचा गॅस दिला जात असल्याच्या तक्रारींनंतर वैध मापन शास्त्र विभाग पुणे शहर व जिल्ह्यात धडक तपासणी मोहिम राबवत आहे. या मोहिमेत कोरेगाव पार्क आणि कोथरूड-वनाज परिसरात वितरित होणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरमध्ये प्रमाणित १४.२ किलो ग्रॅम वजनापेक्षा तफावत आढळून आली. संबंधित वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहनियंत्रक विलास पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, “शहर व जिल्ह्यात गॅस सिलिंडरचे वजन कमी असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अचानक तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. कोरेगाव पार्क व कोथरूड परिसरातील काही वितरकांकडे सिलिंडरमध्ये गॅस कमी आढळला. संबंधितांवर दंडाची कारवाई सुरू असून ही मोहिम पुढेही सुरू राहणार आहे.”

ही कारवाई उपनियंत्रक द. ग. महाजन व ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुदर्शन बनसोडे, दिनेश सोमनाथे, धनश्री तेलंग आणि अजय जोगदंड यांनी केली.
तोलन यंत्र कपाटातच!
शहरातील अनेक वितरकांकडे अपुरे मनुष्यबळ, मोठ्या प्रमाणावर सिलिंडर वितरणाचे उद्दिष्ट आणि कामाचा ताण यामुळे सिलिंडरचे वजन न करता थेट ग्राहकांना वितरण केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वितरकांनी कार्यालयातील तोलन काटे कपाटात ठेवले असून, काहींनी वर्षानुवर्षे तोलन यंत्रांची तपासणी व मुद्रांकनच करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.
होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही तोलन उपकरणे नसल्याने सिलिंडरमधील गॅसचे अचूक वजन ग्राहकांना तपासता येत नाही. अनेक ग्राहकांना सिलिंडर वजन करून घेण्याचा अधिकार आहे, याची माहितीच नसल्याचे दिसून आले आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
सहनियंत्रक विलास पवार यांनी आवाहन केले की, “स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर स्वीकारताना त्याचे सील व्यवस्थित असल्याची खात्री करावी. सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी उपलब्ध तोलन उपकरणावर वजन तपासावे. रिकाम्या सिलिंडरचे वजन आणि गॅसचे निव्वळ वजन सिलिंडरवर दर्शविलेले असते. पावतीवरील वजनाची पडताळणी करावी.”
कायदेशीर कारवाईचा इशारा
वैध मापन शास्त्र कायद्यानुसार तोलन उपकरणांची नियमित तपासणी व मुद्रांकन न केल्यास संबंधितांवर खटला दाखल होऊ शकतो. तसेच वितरकांकडे तोलन यंत्र उपलब्ध नसल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
वैध मापन शास्त्र विभागातर्फे विशेष अभियानांतर्गत वितरकांकडील तोलन यंत्रांची तपासणी केली जात आहे. सिलिंडरचे वजन करून न दिल्यास ग्राहकांनी नियंत्रण कक्षाच्या 9869691666 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.