पुणे: माजी नगरसेविका लता धायरकर यांचे निधन घोरपडी-कोरेगाव पार्क प्रभागाच्या विकासासाठी झटलेल्या लता ताईंची अखेरची विदाई

पुणे: प्रभाग क्रमांक २१ घोरपडी-कोरेगाव पार्कच्या माजी नगरसेविका आणि कार्यतत्पर समाजसेविका लता ताई धायरकर (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
लता ताई धायरकर या हडपसर मतदारसंघातील भाजपचे सरचिटणीस किशोर धायरकर यांच्या मातोश्री होत्या. सर्वसामान्य गृहिणी म्हणून जीवन जगताना २०१७ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवड जिंकली आणि आपल्या प्रभागातील विकासकार्यांना गती दिली.
प्रभागाच्या विकासाची धुरा समर्थपणे सांभाळली
लता ताई यांनी प्रभागाच्या शाश्वत विकासावर विशेष भर दिला. त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलिस चौकीचे उभारणी काम, कुस्ती आखाड्याची उभारणी, तसेच कॅनॉलवरील विसर्जन घाटाचे काम पूर्णत्वास नेले.
कोरोना महामारीच्या काळात स्वतः आजारी असूनही त्यांनी घरातून यंत्रणा राबवत लोकांची सेवा केली. यामुळे त्यांची एक कार्यतत्पर आणि संवेदनशील नेत्या म्हणून ओळख निर्माण झाली.
पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्त्व
पालिकेच्या विविध पदांवर काम करताना त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने प्रभागातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.