पुणे: ‘फाईल गहाळ झालीय, पैसे द्या!’ – ग्राहक आयोग व मामलेदार कार्यालयातील दोन जण लाच घेताना रंगेहाथ

पुणे | प्रतिनिधी
सामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुण्यातील दोन ठिकाणी धडक कारवाई केली. ग्राहक तक्रार निवारण आयोगातील लिपिक व मामलेदार कचेरी परिसरातील महिला टंकलेखक यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही घटनांमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा भांडाफोड झाला आहे.
‘फाईल गहाळ आहे’, म्हणत लिपिकाची लाचखोरी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील लिपिक योगेश चवंडके (वय ३७) याने फाईल गहाळ झाल्याची बतावणी करत एका ५८ वर्षीय नागरिकाकडे २,००० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने दीड हजार रुपये देण्याचे मान्य केले. यासंदर्भात ACB कडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
मंगळवारी (दि. १) दुपारी नवीन प्रशासकीय इमारतीच्या उपाहारगृहाजवळ चवंडके याने लाच स्वीकारली. त्याच क्षणी ACB पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. बंड गार्डन पोलीस ठाण्यात त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.
तक्रारदाराचा २०२२ मध्ये अपघात झाला होता. विमा कंपनीने भरपाई नाकारल्याने त्यांनी आयोगात दाद मागितली होती. मात्र, सुनावणीच्या दिवशी लिपिकाने ‘फाईल सापडत नाही’ सांगत लाच मागितल्याचे उघड झाले.
‘खरेदीखताची प्रत हवी? पैसे द्या!’ – महिला टंकलेखकाकडून लाच मागणी
दुसऱ्या प्रकरणात, हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात टंकलेखन करणारी अनिता विनोद रणपिसे (वय ५४, रा. जेजुरी जकातनाका, सासवड) हिने खरेदीखताची प्रत मिळवून देण्यासाठी ६,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तडजोडीत ५,००० रुपये देण्याचे मान्य करुन तक्रार नोंदवली.
ACB ने मंगळवारी छत्रपती शिवाजी रस्त्यावरील तहसिल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सापळा रचला. रणपिसे हिने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये घेतले, त्यातील एक हजार रुपये तक्रारदाराला परत केले. मात्र त्याचवेळी ACB च्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक भारती मोरे करत आहेत.
दोन कारवायांनी उघड केला कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा चेहरा
या दोन्ही घटनांनी सामान्य नागरिकांच्या न्यायप्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा आणि त्यातून काही कर्मचारी लाच घेऊन कसा गैरफायदा घेतात, याचा स्पष्ट प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे, सरकारी कामासाठी सध्या ‘खिसा गरम केल्याशिवाय काही मिळत नाही’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
लाचखोरांवर कारवाई करून एसीबीने नागरिकांचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न केला असून, भ्रष्टाचार रोखण्यासाठी अशा कारवाया अधिक वाढण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.