पुणे: बेलबाग चौकातील महिला पत्रकार विनयभंग प्रकरण; अखेर ढोल-ताशा पथकातील दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी

0
3e03120c-1395-4dd4-9e31-9b6ba3357fc6_1757422230540.webp

पुणे : अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बेलबाग चौकात एका २० वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ढोल-ताशा पथकातील दोन सदस्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोज बबन नवगिरे (३४, रा. मंगळवार पेठ, पुणे) आणि चिराग नरेश किराड (२४, रा. लाल देऊ सोसायटी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे त्रिताल ढोल-ताशा पथकाचे सदस्य आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथक प्रमुख मनोज बबन नवगिरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी तक्रारदार पत्रकार महिलेच्या उपस्थितीत कंट्रोल रूममध्ये दाखवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली.

सरकारी वकील यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून तो महिला सुरक्षेशी संबंधित अजामीनपात्र गुन्हा आहे. घटनेवेळी महिला पत्रकार वार्तांकनासाठी घटनास्थळी होती. तिच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पंचनाम्यासह पुराव्यादाखल जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील करत आहेत.

दरम्यान, बचाव पक्षाचे वकील प्रताप परदेशी यांनी युक्तिवाद करताना अजब दावा केला. ते म्हणाले की, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बेलबाग चौकात इतकी प्रचंड गर्दी असते की पोलिस आयुक्तांनाही धक्काबुक्की होऊ शकते. गर्दीमुळे माझी देखील पँट फाटली होती. त्यामुळे आरोपींनी जाणीवपूर्वक काही केले नाही. फक्त पत्रकार तरुणीच्या पायावरून ट्रॉलीचे चाक गेले, एवढाच प्रकार घडला आहे.

परंतु, सरकारी वकीलांनी आरोपींनी जाणूनबुजून विनयभंगाचा प्रकार केल्याचा ठाम दावा केला.


Spread the love

Leave a Reply

You may have missed