पुणे: येरवडा पोलिसांचा खंडणी प्रकार उघड; तरुणाला धमकावत पन्नास हजारांची मागणी; दोन पोलिसांविरुद्ध चौकशी सुरू; खंडणीप्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल

0
n6616298131745644950214767b8c2da6b2ddc4316835a2804be3776646538e97d47f821ccf29b0ca0bedc7.jpg

पुणे, २६ एप्रिल: बाणेर बीट मार्शलच्या लाचखोरी प्रकरणाची चर्चा थांबत नाही, तोवर येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी खंडणी मागून विभागाची मान शरमेने झुकवली आहे. एका तरुणाला अडवून त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी करत धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

“दैनिक पुढारीने” दिलेल्या वृत्तानुसार, घटनेतील तरुण टिंगरेनगर येथे राहणारा असून, तो एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास तो येरवड्यातील कॉमर्स झोनमधील डॉक्टरकडे वैद्यकीय उपचारासाठी गेला होता. त्यानंतर बाहेर पडल्यावर त्याला त्याची मैत्रीण भेटली. दोघे कारमध्ये बसून संवाद साधत असताना एका पोलिसाने त्यांच्यावर अश्लील चाळे केल्याचा आळ टाकत थेट पन्नास हजार रुपयांची मागणी केली.

सुरुवातीला तरुणाने विनवणी केली की, त्याने कोणतीही चूक केलेली नाही. मात्र, पोलिसांनी ऐकून न घेता त्याला चौकीसमोर उभे करून ठेवले. यानंतर दुसऱ्या पोलिसाला बोलावण्यात आले. या दोघांनी मिळून वीस हजार रुपये द्यावेत, अन्यथा गाडी जप्त करून गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली.

तरुणाने प्रसंगावधान राखत आपल्या मामाला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. मामा यांनी त्याला थेट येरवडा पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर संबंधित तरुणाने दोन पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तत्काळ कारवाई करत तक्रार नोंदवली आणि आरोपी पोलिसांची नावे – दयानंद कदम व अविनाश देठे – स्पष्ट केली.

दोघेही पोलिस कर्मचारी तपास पथकात कार्यरत असून, याप्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.

“रक्षकच जर भक्षक बनत असतील, तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर?” असा सवाल सध्या शहरात चर्चेत आहे. संबंधित तरुणाने धैर्य दाखवत पोलिस ठाणे गाठल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. अन्यथा अशा घटना किती वेळा घडल्या असतील, याचा शोध घेणे प्रशासनासाठी गरजेचे झाले आहे.

— रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे
“तक्रारदार तरुणाकडून माहिती घेण्यात आली आहे. त्यावर आधारित अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे. पुढील कारवाई तेथून निश्चित होईल.”

Spread the love

Leave a Reply

You may have missed