पुणे: कोंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा; 28 हजारांची उकळपट्टी, निलंबन

n66759667517493663723529b09b029c84d5d1012027aa8e5b3f2b0222e5fda243b0d4aaf40a1eda097df98.jpg

पुणे, दि. ८ जून: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत असून, आता पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीच्या गुन्ह्याची नोंद झाली असून, त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

विक्रम लक्ष्मण वडतीले (पदस्थ – कोंढवा पोलीस ठाणे) असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने तब्बल २८ हजार रुपये खंडणी घेतल्याचा आरोप आहे. ही घटना ५ जून रोजी सायंकाळी सात ते साडे नऊच्या दरम्यान बोपदेव घाट परिसरात घडली.

नेमकं प्रकरण काय?

चेन्नईहून पुण्यात आलेल्या तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर, विक्रम वडतीले याने त्याच्याकडून ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर त्याचा मित्र केदार जाधव याने गुगल पे द्वारे २८ हजार रुपये पाठवले.

तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत वडतीले याला सेवेतून निलंबित केले आहे. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त रितसर गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन घेतली.

पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

बोपदेव घाट परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त असतो. विक्रम वडतीले यांची त्या दिवशी त्या ठिकाणी ड्युटी होती. मात्र, ड्युटीच्या वेळीच अशा प्रकारची गंभीर घटना घडल्याने पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुणे शहरातील पोलीस खात्याची प्रतिमा डागाळणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the love

You may have missed