पुणे: कामचुकार अधिकारी आयुक्तांच्या रडारवर; निष्क्रीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी
पुणे, २४ ऑक्टोबर : पुणे महापालिकेत कामचुकार आणि निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार लटकली आहे. नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकार आणि निधी नसल्याची तक्रार करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना आता आपल्या कारभाराचे उत्तर द्यावे लागणार आहे. आयुक्तांनी अधिकार आणि निधी दोन्ही वाढवून दिल्यानंतरही त्याचा उपयोग न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता थेट बदली किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
आयुक्तांनी अलीकडेच घेतलेल्या पाहणीत स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सेवांमध्ये गंभीर दुर्लक्ष झाल्याचे आढळले. अनेक विभागांमध्ये ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांची बदली केली असून, पुढेही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
महापालिकेत गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकाचे राज्य आहे. नगरसेवक नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सैल झाले आहे. अनेक अधिकारी कामावर उशिरा येणे, कार्यालयातून लवकर जाणे, तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष करणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिक किंवा राजकीय पदाधिकारी कार्यालयात गेले तरी काम होत नाही, अशा तक्रारी आयुक्तांकडे वारंवार पोहोचत आहेत.
यावर आयुक्तांनी स्पष्ट इशारा दिला आहे — “कामात निष्काळजीपणा किंवा गंभीर चूक झाल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाईल.”
या पार्श्वभूमीवर महापालिकेतील काही सहाय्यक आयुक्त आणि विभागप्रमुख आयुक्तांच्या रडारवर आले आहेत.
—