पुणे: कर्तव्यावर मद्यधुंद! उपनिरीक्षक माटेकर निलंबित; लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संजय माटेकर यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहतूक विभागाच्या आदेशानुसार त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार पोलीस खात्याच्या शिस्तीला आणि प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरला आहे.
२९ जून रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात “ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह” मोहिमेसाठी कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी एक चारचाकी वाहन थांबवून गाडीतील तिघांशी वाद घातला. विशेष म्हणजे, त्यावेळी माटेकर स्वतःच मद्यधुंद अवस्थेत होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मद्यप्राशन करून कर्तव्यावर असणे हे महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे उल्लंघन असल्याने माटेकर यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर कृत्याची दखल घेत वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी त्यांचे निलंबन आदेशित केले आहेत.
पोलिस खात्याचे प्रतिनिधित्व करताना बेशिस्त वर्तन, बेजबाबदारपणा आणि शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे पोलीस खात्याच्या शिस्तीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा घटना सामान्य जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत करणाऱ्या ठरत आहेत.