पुणे: नालेसफाईची कामे तातडीने करा, अन्यथा आंदोलन करणार – रवींद्र धंगेकर यांचा इशारा

पुणे, प्रतिनिधी – पुणे शहरात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेला चिमटा काढत नालेसफाईची कामे तातडीने व पारदर्शकपणे हाती घ्यावीत, अन्यथा गटारीचे तुंबलेले पाणी सोबत आणून शिवसेना स्टाइलने महापालिकेत आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
धंगेकर यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना यासंदर्भात पत्र पाठवले असून, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे योग्य प्रकारे न झाल्यास मोठा जनआक्रोश उफाळून येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
धंगेकर म्हणाले, “मे महिन्यात केवळ तासभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. नाले, चेंबर तुंबलेले होते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतुकीची कोंडी झाली आणि अनेक भाग तळ्यात रूपांतरित झाले.”
महापालिकेने नुकतेच ९० टक्के पावसाळी कामे पूर्ण केल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पाहता हा दावा हवेतच असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली. कामे खरोखर पारदर्शकपणे झाली असती, तर तासाभराच्या पावसाने शहराला अशा परिस्थितीत आणले नसते, असे धंगेकर म्हणाले.
“नालेसफाईसाठी स्वतंत्र पथक नेमावे. दररोजची कामगिरी छायाचित्रे, व्हिडिओ स्वरूपात संकलित करावी. अचानक भेटी घेऊन कामांची पाहणी करावी. ही मोहीम पारदर्शकपणे राबवली गेल्यास पावसाळ्यात होणारी अडचण कमी होईल,” असा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच, आतापर्यंत झालेल्या पावसाळी कामांवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे नेमके काय झाले, आणि यामध्ये दोषी ठरणाऱ्यांवर काय कारवाई झाली, हे महापालिकेने जाहीर करावे, अशी ठाम मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली.