पुणे: महापालिकेत शिस्तीचा दणका; 550 कर्मचारी आणि 6 विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

0
IMG_20250823_125649.jpg

पुणे : राज्य शासनाच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेत (PMC) पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असला, तरी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या उशिरा हजर होण्याच्या सवयीला आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी (दि. 22) चाप लावला.

सकाळी अचानक तपासणी करत आयुक्तांनी महापालिकेच्या मुख्यालयात उशिरा आलेल्या तब्बल 550 कर्मचारी आणि सहा विभागप्रमुखांना गेटबाहेर थांबवत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.

महापालिकेची निश्चित कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी असली, तरी अनेक अधिकारी आणि कर्मचारी 12 वाजूनही कार्यालयात दाखल झाले नव्हते. नागरिकांना कामासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारींवरूनच ही कारवाई करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून प्रशासकराज सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद मिळत नाही, तर विभागप्रमुख मनमानी करीत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. आयुक्तांच्या या धडक कारवाईनंतर महापालिकेत शिस्त बसेल का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचा अनुभव असा की, शुक्रवारपासून अनेक अधिकारी व कर्मचारी गायब होतात. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा प्रत्यक्षात ‘चार दिवसांचा’ ठरत असल्याची टीका होत आहे. तसेच, जेवणाची ठरलेली अर्ध्या तासाची वेळ सोडून काही विभागातील अधिकारी दीड वाजताच हॉटेलवर रवाना होतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाज दुपारी उशिरा सुरू होते.

सायंकाळी साडेपाचलाच कार्यालय सोडणे, सोमवारी व गुरुवारी नागरिकांना दिलेली भेटीची वेळ न पाळणे, हे प्रकार नियमित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे नागरिक थेट आयुक्तांकडे तक्रारी घेऊन जात आहेत.

आयुक्तांच्या कठोर कारवाईनंतर महापालिकेत कामकाजात शिस्त बसेल का, हा मोठा प्रश्न पुणेकरांपुढे उभा राहिला आहे.


Spread the love

Leave a Reply