पुणे: धानोरीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास सहआयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा

0
pudhari_import_wp-content_uploads_2022_07_WhatsApp-Image-2022-07-27-at-3.26.21-PM-1.webp

पुणे : धानोरी परिसरात कचऱ्याचे प्रश्न चिघळले असून, संपूर्ण भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या गाड्या नियमितपणे न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

पर्यायाने नागरिकांना घरगुती व व्यावसायिक कचरा रस्त्यावरच टाकावा लागत आहे. मात्र रस्त्यावर पडलेला कचरा वेळेत उचलला जात नसल्यामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, काही शाळांच्या शेजारी देखील कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर धनंजय जाधव फाउंडेशनने येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदन देत धानोरी परिसर आठ दिवसांत कचरामुक्त न झाल्यास थेट सहआयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा दिला आहे.

या तक्रारीनंतर येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयात यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला क्षेत्रीय सहआयुक्त अशोक भवारी, उपअभियंता चंद्रसेन नागटिळक आणि संबंधित आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा पूजा जाधव, संस्थापक धनंजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते देखील या वेळी उपस्थित होते.

बैठकीत जाधव यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “प्रत्येक शाळेसमोर साचणारा कचरा त्वरित हटवला गेला नाही, तर तोच कचरा विद्यार्थ्यांसोबत घेऊन PMCच्या सहआयुक्तांच्या दालनासमोर टाकण्यात येईल.”

यावर उत्तर देताना सहआयुक्त अशोक भवारी म्हणाले, “कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने नियमित कचरा उचलण्यात अडचणी येत आहेत. मात्र, लवकरच तात्काळ उपाययोजना करून कडक दंडात्मक कारवाई केली जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध घातला जाईल.”

नागरिकांनी देखील या समस्येविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता येत्या आठ दिवसांत PMC काय पावले उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed