पुणे: प्रेमभंगातून नैराश्य; सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या

पुणे: शहरातील पोलीस वसाहतीत सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ऋषिकेश कोकणे असे या तरुणाचे नाव असून, तो बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता.
प्राथमिक तपासानुसार, प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी तपास करताना पोलिसांना एक व्हिडीओ सापडला असून, त्यामध्ये त्याने आत्महत्येपूर्वी आपले मनोगत व्यक्त केल्याचे आढळले आहे.
आई-वडील घरी नसताना घेतले टोकाचे पाऊल
घटनेच्या वेळी ऋषिकेश याचे आई-वडील घरी नव्हते. त्या दरम्यान त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण पोलीस वसाहतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.