पुणे: आयुक्त नवलकिशोर राम ‘अॅक्टिव्ह मोड’वर; चार विभागांत ८८ अनधिकृत होर्डिंग आढळले; शहरातील २६४० होर्डिंग अधिकृत,

पुणे : शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या प्रकरणावर पुणे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. आयुक्त नवलकिशोर राम यांनी ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये कारवाई करत चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सापडलेल्या ८८ अनधिकृत होर्डिंगपैकी २४ होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश दिले.
महापालिकेकडून सुमारे २६४० अधिकृत होर्डिंगला परवाने दिलेले असले तरी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारले गेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वीच अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, १४ क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या अहवालात केवळ २४ अनधिकृत होर्डिंग असल्याचे दाखवण्यात आले. या आकडेवारीवर संशय घेत आयुक्तांनी स्वतंत्र पथक नेमले.
या पथकाच्या तपासणीत नगररस्ता-वडगाव शेरीत ३५, हडपसर-मुंढव्यात ३७, वानवडी-रामटेकडीत ११ आणि येरवडा-कळस-धानोरीत ५ अशी एकूण ८८ अनधिकृत होर्डिंग समोर आली. त्यापैकी २४ होर्डिंग तातडीने काढण्यात आली.
याबाबत आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, “अनधिकृत होर्डिंगला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. स्वतंत्र पथक सतत तपासणी करत राहील आणि खोटी माहिती दिल्यास संबंधितांवर कठोर निर्णय घेतला जाईल.”
अलीकडेच वाघोली भागात होर्डिंग कोसळून अपघात झाल्याने सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी आणि शहराच्या दृश्य गुणवत्तेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरते.
दरम्यान, नगररस्ता-वडगाव शेरी विभागात सात अनधिकृत होर्डिंग असल्याचा चुकीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले, तर कनिष्ठ लिपिकाची एक वेतनवाढ थांबवण्यात आली आहे.
महापालिकेची ही कारवाई शहरातील नियमशिस्त टिकवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
—