पुणे: बेकायदा जाहिरातबाजीमुळे पुण्यातील क्लास आणि अभ्यासिकांवर गुन्हे दाखल – वाचा सविस्तर

3c25010a-4e1b-47cb-a564-93cca7712493.jpg

पुणे – पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या खासगी क्लासेस आणि अभ्यासिकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, या क्लासेस आणि अभ्यासिकांच्या जाहिरातींसाठी नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बॅनर आणि पोस्टर्स लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. परिणामी, महापालिकेच्या परवानगीशिवाय शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तीन संस्थांवर कारवाई
महापालिकेच्या कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या तपासणीत राज्यघटना बी. एन. अकॅडमी (शास्त्री रोड), ध्रुवतारा अभ्यासिका (गांजवे चौक, नवी पेठ) आणि यूपीएससी गाईड (प्रबोधनी सदाशिव, पेठ पुणे) यांनी अनधिकृत जाहिराती केल्याचे आढळून आले. यावर कारवाई करत, महापालिकेचे आकाश चिन्ह परवाना निरीक्षक केदार पुरी यांनी फिर्याद दाखल केली.

महापालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष
महापालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून अनेक क्लास आणि अभ्यासिका चालकांना अनधिकृत जाहिरातींबाबत नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, त्याकडे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दंडात्मक रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने महापालिकेने कठोर भूमिका घेत पोलिसांत थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

बेकायदा जाहिरातींवर कारवाई सुरू
शहरात विद्युत खांब, डीपी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. महापालिकेच्या पथकाने अप्पा बळवंत चौक, नूमवि शाळेशेजारी, शनिपार चौक, शनिमंदिराजवळ आणि बाजीराव रोड या भागात लावलेले अनधिकृत बॅनर हटवले. तसेच, या जाहिरातींविरोधात महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
“परवानगीशिवाय जाहिराती करणे हा कायद्याचा भंग आहे. महापालिकेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या क्लास आणि अभ्यासिकांवर कठोर कारवाई केली जाईल. बेकायदा जाहिरात करणाऱ्यांना दंड आकारण्याबरोबरच थेट पोलिस कारवाईलाही सामोरे जावे लागेल,” असे केदार पुरी यांनी सांगितले.

शहरात अनधिकृत जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन संयुक्तपणे कारवाई करत आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Spread the love

You may have missed