पुणे शहरः गुन्ह्यातील कार परत मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला सहाय्यक सरकारी वकिलावर लष्कर न्यायालयात पुणे एसीबीची कारवाई
पुणे : अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराच्या घटना वाढत आहेत. अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सर्रासपणे लाच घेताना आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे.
गुरुवारी (ता. १५) पुण्यात एका महिला सरकारी वकीलाला १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं आहे.
अंजला नवगिरे (वय ५४) असे या वकील महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३६ वर्षीय महिलेने यासंदर्भात तक्रार केली होती.
माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता. त्या गुन्ह्यात वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली होती. ती मोटार परत मिळवण्यासाठी तक्रारदार महिलेने लष्कर न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने या अर्जावर सरकारी वकील अंजला नवगिरे यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. यादरम्यान, तक्रारदार महिलेने नवगिरे यांची भेट घेतली असता, नवगिरे यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच मागितली.
लाच देण्याची इच्छाच नसल्यामुळे तक्रारदार महिलेने त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि ही माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित सापळा रचून नवगिरे यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. या घटनेनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.