पुणे शहर : शहरात अवैध धंदे लपून छापून सुरूच? शहरात मटका किंग नंदू नाईकच्या अड्यावर पोलिसांचा धाडसी छापा; 2 लाखांचा ऐवज जप्त, 8 जणांना अटक
पुणे: पुण्यातील कुख्यात मटका किंग नंदू नाईक यांच्या शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंगमधील अड्यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकला आहे. या कारवाईत एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराच्या साधनांसह एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनेक वेळा पोलिसांनी छापे टाकल्यानंतर देखील नंदू नाईक यांचे मटक्याचे अड्डे पुणे शहरात सुरुच असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेचे युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत: संतोष लक्ष्मण गुजर (वय ५२, रा. शिवाजीनगर गावठाण), रवींद्र धोंडिबा गजदाणे (वय ४२, रा. पिरंगुट), गोविंद अनंतराव वेदपाठक (वय ४३, रा. सासवड), राजू बबनराव गोरे (वय ३२, रा. पिरंगुट), किसन दत्तात्रय तावरे (वय ४३, रा. पिरंगुट), रोहन किसन तावरे (वय १९, रा. धाराशिव), निलेश कृष्णाजी रणपिसे (वय ५२, रा. सांगवी), आणि नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७६, रा. शुक्रवार पेठ).
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक उर्फ मटका किंग हे नावाने ओळखले जाणारे व्यक्ती, पुणे शहरातील विविध ठिकाणी मटक्याचे अड्डे चालवत असतात. जनसेवा भोजनालयाच्या पाठीमागे असलेल्या अड्ड्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ आणि २ च्या पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार, पोलीस पथकाने शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंग येथे छापा टाकला. त्या वेळी आरोपींकडून कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठ्या देण्यात येत होत्या. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये मोबाईल, ९५,७४० रुपये रोख रक्कम आणि जुगाराची साधने यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम करीत आहेत.