पुणे शहर: बदली आदेशांकडे दुर्लक्ष; मनपा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह

पुणे : महापालिकेतील काही अधिकारी बदली आदेश असूनही मूळ कार्यलयातच कार्यरत राहिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिक रमेश खामकर यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत मनपा प्रशासनाला जाब विचारला आहे.
श्री. रामा सोनावणे हे कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांची बदली आदेशाने दुसरीकडे करण्यात आली असली तरी ते गेल्या पंधरा दिवसांपासून नव्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्याचबरोबर, कोथरूड-बावधन कार्यालयात बदलीने आलेले ३-४ नवीन एस. आय. गेल्या पंधरा दिवसांपासून कामाशिवाय बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप खामकर यांनी केला आहे. “सामान्य नागरिकांचा कररूपी पैसा अशा पद्धतीने का उधळला जातो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या संदर्भात त्यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्री. चंद्रन यांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र, “आयुक्तांची भेट घ्या” असे उत्तर मिळाल्याने खामकर यांनी नाराजी व्यक्त केली. “अतिरिक्त आयुक्तांना विषय समजत नसेल अथवा तो सोडविता येत नसेल, तर त्यांना शासनाकडे परत का पाठवू नये?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मनपात कामाचा ताण आणि व्याप्ती लक्षात घेऊन तीन अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आली होती. मात्र, त्याचा उपयोग होत नसल्याचे खामकर यांचे मत आहे. त्यांनी आयुक्तांकडे थेट तक्रार दाखल करून बदली आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून आर्थिक तोटा वसूल करण्याची मागणी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर उपआयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) प्रसाद काटकर यांनी उघड केले की, “बदली धोरण राबवताना सेवकांना तीन पसंतीच्या जागा विचारूनच बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तरीही काही सेवक बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. शासन परिपत्रकानुसार अशा प्रकरणांत वेतनाच्या ३% दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.”
काटकर यांनी असेही सूचित केले की, काही सेवकांची बदली करून पुन्हा त्याच जागी नेमणूक केली जाते. “यामागे आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चा मनपात दबक्या आवाजात होत आहेत. विशेष सवलती, तोंड पाहून निर्णय आणि मोबदल्याच्या आधारे बदलीत फेरफार होत असल्याचा संशय निर्माण होत आहे,” असे ते म्हणाले.
या सर्व प्रकरणामुळे मनपा प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बदली धोरण कितपत निष्पक्ष आहे याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
—