पुणे शहरः येरवड्यात भरधाव ट्रक घराला धडकला, येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल – व्हिडिओ

पुणे – येरवडा भागात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने नियंत्रण सुटल्याने बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका दुकानाला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या घरालाही या धडकेचा तीव्र हादरा बसला. ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की ट्रकच्या समोरील काचा पूर्णपणे फुटल्या. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठा आवाज झाला आणि काही वेळेत घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पहा व्हिडिओ
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच तिथे मोठी गर्दी जमली. यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण काय, हे तपासण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. येरवडा परिसरात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.