पुणे : शालेय वाहनांत सीसीटीव्ही अनिवार्य; ३१ जुलैपर्यंत मुदत, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

0
School-bus.jpg


प्रतिनिधी | पुणे
पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी संयुक्तपणे कंबर कसली असून, शाळांची वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन आणि रिक्षांमध्ये ३१ जुलैपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची नेत्रतपासणी, पोलीस पडताळणी आणि महिलासुरक्षेचे नियमही सक्तीत लागू करण्यात आले आहेत.

शहरात १६ जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक आणि वाहनांमधील सुरक्षेच्या कमतरतेविषयी वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यामध्ये ‘आरटीओ’ला नियमांचे काटेकोर पालन करून अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले.

नियमांचे उल्लंघन = कडक कारवाई
पुणे आरटीओचे उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले की, “३१ जुलैनंतर तपासणीत दोषी आढळणाऱ्या शाळा वाहतुकीच्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल.” शालेय व्यवस्थापन समित्यांनी देखील यामध्ये सक्रिय भूमिका बजावावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे नियम काय आहेत?

३१ जुलैपर्यंत सर्व शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य

सहा वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी महिला कर्मचारी अनिवार्य

मुलींच्या शाळेत वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक

प्रत्येक चालकाची वार्षिक नेत्रतपासणी अनिवार्य, त्याचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक

शालेय बस, व्हॅन चालक व वाहकांची पोलीस पडताळणी बंधनकारक

रिक्षामधून केवळ पाचच विद्यार्थ्यांची वाहतूक परवानगी

शालेय समितीने क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे का याची नियमित तपासणी करणे आवश्यक


संयुक्त तपासणी मोहीम सुरू
पुणे पोलीस आणि आरटीओ विभाग संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शाळांना देखील ‘शालेय परिवहन समिती’ व ‘विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समिती’च्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पालकांनी देखील याबाबत जागरूक राहावे आणि नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed