पुणे: गणेश पेठेतील व्यावसायिकाला ८ वर्षे दमदाटी करून ४८ लाखांची खंडणी; आंदेकर टोळीचा उच्छाद, शिवम आंदेकरसह साथीदार अटकेत

0
IMG_20250608_124239.jpg

पुणे, दि. ८ जून: पुण्यातील गणेश पेठेतील मासळी बाजारात गेल्या ८ वर्षांपासून एका व्यावसायिकाकडून दरमहा ५० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या कुख्यात आंदेकर टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात टोळीचा म्होरक्या शिवम आंदेकर आणि त्याचा साथीदार आकाश परदेशी यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी न दिल्याचा सूड म्हणून दुकान फोडून साहित्य नेले टेम्पोतून

व्यावसायिकाने हप्ता देणे थांबवल्यानंतर मे महिन्यात टोळीने दुकानात घुसून साहित्य फेकून दिले आणि टेम्पोतून घेऊन गेले, असा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आंदेकर आणि परदेशीला अटक केली.

आठ वर्षांचा हप्ता ४८ लाखांवर

२०१६ ते मे २०२५ या कालावधीत आंदेकर टोळीने ५० हजार रुपये मासिक हप्ता उकळत ४८ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे समोर आले आहे. आंदेकरने व्यावसायिकाला जीव मारण्याची धमकी देत सुरुवात केली होती, तर परदेशी गेली आठ वर्षे ही रक्कम नियमितपणे उकळत होता.

गुन्हेगारीचा प्रदीर्घ इतिहास

शिवम आंदेकर हा माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर याचा मुलगा असून, त्याच्यावर खंडणी, मारामारी, धमकी, सरकारी कामात अडथळा अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१७ मध्ये त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो पुन्हा शहरात परतला होता. २०२१ मध्ये चतु:शृंगी परिसरात पोलिसांशी वाद घालून पुन्हा अटक झाली होती.

पोलिसांची तत्पर कारवाई

या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड आणि उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

प्रशासनाचे आवाहन

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या खंडणी, दमदाटीच्या घटना घडल्यास कोणतीही भीती न बाळगता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळता येतील.

🔴 गुन्ह्याचा कालावधी: २०१६ ते मे २०२५
🔴 खंडणी रक्कम: मासिक ५०,००० रुपये, एकूण ४८ लाख
🔴 अटक: शिवम आंदेकर, आकाश परदेशी
🔴 गुन्हे: खंडणी, दरोडा, धमकी, सरकारी कामात अडथळा
🔴 पोलीस ठाणे: फरासखाना, पुणे

Spread the love

Leave a Reply

You may have missed