पुणे: आझम कॅम्पस ते फुले वाडा: विद्यार्थ्यांची ऐतिहासिक मिरवणूक; दरबार ब्रास बँड आणि जिवंत देखाव्यांनी सजलेली मिरवणूक – व्हिडिओ

15ff8416-06aa-4dd2-b2b1-3483b2d6a3c9_1732787683641.webp

पुणे: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी( आझम कॅम्पस)च्या वतीने महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त ८ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिवादन मिरवणूक काढली. ही मिरवणूक आझम कॅम्पस ते महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक (गंज पेठ) या मार्गावर काढण्यात आली.

मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्याहस्ते झाले तर संस्थेचे सचिव इरफान शेख व पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.संस्थेच्या ३० आस्थापनांमधील ८ हजार विद्यार्थी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.

महात्मा फुलें,सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी यांच्या वेशातील विद्यार्थी होते. दरबार ब्रास बँड, बैलगाडीवर जिवंत देखावा,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी, पदाधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक, प्राध्यापक सहभागी झाले. डॉ.पी.ए.इनामदार, प्रा.इरफान शेख, साबीर शेख, मशकूर शेख, महंमद गौस सय्यद यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य,विश्वस्त आणि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक या अभिवादन मिरवणुकीत सहभागी झाले.फुले वाड्यात या सर्वानी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना वंदन केले.

मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस,पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बबनमिया चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा होता. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली तसेच नागरिकांनी देखील अभिवादन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे 20 वे वर्ष होते. दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

Spread the love

You may have missed