पुणे: हडपसरच्या जिजाऊ चौकात ‘सीसीटीव्ही’साठी खोदकाम, पण वाहतूक नियंत्रण मात्र अंधारात! – व्हिडिओ

0
IMG_20251225_195609.jpg

पुणे | प्रतिनिधी
हडपसर येथील जिजाऊ चौक सध्या वाहनचालकांसाठी नव्हे, तर संयमाची परीक्षा घेणारे केंद्र बनले आहे. सीसीटीव्ही बसवण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे चौकात प्रचंड वाहतूक जाम होत असून, नागरिक अक्षरशः तासन्‌तास अडकत आहेत. मात्र या साऱ्या गोंधळात वाहतूक कर्मचारी कुठेच दिसत नाहीत—किंवा दिसले तरी चौकात घोळका करून उभे राहण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे.

हा व्हिडिओ

‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली सीसीटीव्ही बसवले जात आहेत, पण प्रत्यक्षात वाहतूक नियंत्रण मात्र पूर्णपणे आंधळे झाले आहे. चौकात कुठलाही नियोजनबद्ध मार्गदर्शन नसल्याने वाहनांच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. अवैध रिक्षा पार्किंगने तर परिस्थिती आणखी चिघळवली असून, चौकाच्या मधोमध रिक्षांचा अड्डाच उभा राहिल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस चौकात उभे राहून जाम सोडवण्याऐवजी ‘घोळका संस्कृती’ जोपासताना दिसत असून, कारवाईपेक्षा वसुलीच जास्त सुरू असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. “जाममध्ये अडकलेल्या वाहनचालकांकडे पाहण्याऐवजी कोणाला थांबवायचे आणि कोणाकडून दंड वसूल करायचा, यातच यंत्रणा गुंतली आहे,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

दरम्यान, खोदकाम सुरू असताना पर्यायी मार्ग, सूचना फलक किंवा वाहतूक नियोजनाचा अभाव ठळकपणे जाणवतो. सीसीटीव्ही बसवल्यानंतर नियम मोडणाऱ्यांवर नजर राहील, मात्र आज नियम पायदळी तुडवले जात असताना ती नजर कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

हडपसरच्या जिजाऊ चौकातील हा गोंधळ पाहता, ‘सीसीटीव्ही बसवतोय म्हणजे सगळं ठीक होईल’ हा गैरसमज दूर करून, प्रत्यक्ष मैदानात उतरून वाहतूक सुरळीत करण्याची गरज असल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत. नाहीतर सीसीटीव्हीमध्ये कैद होणारी दृश्ये ही फक्त जाम, गोंधळ आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचीच साक्ष देतील.

Spread the love

Leave a Reply