पुणे: गुंडगिरीविरोधी भाषणं आणि उमेदवारीतील विसंगती! अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर पुण्यात सवालांची सरबत्ती

IMG_20251230_133311.jpg

पुणे : “पुण्यातील गुंडगिरी संपवणार” अशी जोरदार भाषा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आता मात्र विरोधाभासाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खंडणी, दहशत, मारहाण, खूनसदृश गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेला गजा मारणे सध्या तुरुंगात असताना त्याच्या पत्नी जयश्री मारणे यांना थेट प्रभाग क्रमांक १० मधून अधिकृत उमेदवारी आणि एबी फॉर्म देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “गुंडगिरीला आळा की गुंडगिरीला आधार?” असा सवाल आता खुलेआम विचारला जात आहे.

कोयता गँग बंद करा, पण गुंडांच्या घरात राजकारण सुरू?

अजित पवारांनी काही महिन्यांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना “कोयता गँग मोडून काढा” अशी स्पष्ट सूचना दिली होती. पोलिसांची संख्या वाढवली, आता गुन्हेगारी आवरा, असा आदेश देणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाकडूनच गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देणे म्हणजे शब्द आणि कृतीतील दरी असल्याची टीका होत आहे.

विशेष म्हणजे, गजा मारणे कोथरूडमधील एका दुचाकीस्वारावर बेदम मारहाण प्रकरणात तुरुंगात आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाशी संबंधित होता. अशा प्रकरणानंतरही उमेदवारी दिली जाणे म्हणजे गुंडांना अप्रत्यक्ष राजकीय संरक्षण दिले जात आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीत वाद मिटतात, उमेदवारी मिळते!

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जाहीर टीका करणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. टीकेनंतर थेट अजित पवारांची भेट आणि त्यानंतर उमेदवारी—
राष्ट्रवादीत वाद मिटवण्याचं सूत्र ‘उमेदवारी’ आहे का? असा टोमणाही आता लगावला जात आहे.

एक मुलगा भाजपचा, दुसरा राष्ट्रवादीचा!

राजकीय विसंगती इथेच थांबत नाही. राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुले महापालिका निवडणुकीत मैदानात आहेत—एक भाजपकडून, तर दुसरा राष्ट्रवादीकडून!
आता दीपक मानकर नेमका कोणाचा प्रचार करणार, की दोन्ही बाजूंना सांभाळणार? असा सवाल पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पुणेकर मतदारांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा?

गुंडगिरीविरोधी घोषणा, कायदा-सुव्यवस्थेवर भाषणं आणि प्रत्यक्षात वादग्रस्त उमेदवारांना तिकीट—
ही सगळी परिस्थिती पाहता, ही निवडणूक विकासाची आहे की राजकीय सोयीची? असा प्रश्न पुणेकर मतदार विचारत आहेत.

महापालिका निवडणूक जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी धोरणामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून, पुण्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

Spread the love

You may have missed