पूणे: फुरसुंगी-उरुळीतील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात – व्हिडिओ

0
IMG_20250423_094318.jpg

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अकार्यक्षम धोरणामुळे फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांतील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. शहरातील विविध गावांमधून निर्माण होणारा व प्रक्रियेसाठी नालायक ठरलेला कचरा सर्रासपणे फुरसुंगी येथील डंपिंग ग्राउंडमध्ये टाकला जात असून, त्यामुळे या भागात दुर्गंधी, रोगराई, डास व माशांचा उपद्रव वाढला आहे.

पुणे महानगरपालिकेने (पुणे मनपा) नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात नियमांचे पालन करण्यास सुचित केले असले तरी, स्वतः मात्र शहराबाहेरील गावांमध्ये कचरा डंप करत आहे. 300 टनांपेक्षा अधिक कचरा सध्या फुरसुंगी डंपिंग ग्राउंडवर साठवून ठेवण्यात आलेला असून, यामुळे तेथील भूजल दूषित झाले आहे. अनेक विहिरी व बोअरवेलमधील पाण्याचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पहा व्हिडिओ

राज्य शासनाने फुरसुंगी व उरुळी देवाची गावांना नगरपरिषद दर्जा दिल्यानंतर झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र प्रत्यक्षात कचरा व्यवस्थापनाच्या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत. स्थानिक रस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये अनधिकृत डंपिंग ग्राउंड तयार होत असून, रस्त्यावर कचरा जाळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. परिणामी प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

डंपिंग ग्राउंडमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांनीही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तरीदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

जनतंत्र संस्थेच्या सौ. दिपाली सरदेशमुख यांनी सांगितले की, “फुरसुंगी आणि उरुळी भागातील कचरा व्यवस्थापन पूर्णतः अपयशी ठरले असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचे जीवित धोक्यात येईल.”

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक व राज्य प्रशासनासह प्रदूषण महामंडळाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.


Spread the love

Leave a Reply