पुणे: कबुतरांचे खाद्य टाकणाऱ्यांवर होणार कारवाई: महापालिकेचा इशारा
पुणे: कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर खाद्य टाकू नये, असे आवाहन पुणे महापालिकेने केले असून, या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कबुतरांच्या पिसे आणि विष्ठेतून होणाऱ्या हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या फुफ्फुसांच्या आजाराचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेने या समस्येवर जनजागृती करत शहरातील विविध ठिकाणी फलक लावले आहेत. या फलकांद्वारे कबुतरांना खाद्य टाकण्याचे दुष्परिणाम आणि आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले आहेत. विशेषतः मुठा नदीकाठ, शनिवार आणि नारायण पेठेतील घाटांवर मोठ्या प्रमाणावर धान्य टाकले जात असून त्यामुळे कबुतरांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमध्ये खोकला, श्वसनाचा त्रास, ताप, आणि यकवा यांचा समावेश आहे. विष्ठा वाळल्यानंतर तिच्या कणांचे सूक्ष्म धुळीत रूपांतर होते, जे हवेत मिसळून मानवी शरीराला अपायकारक ठरते. या धुळीत बुरशीचे बीजाणू, जीवाणू, आणि इतर सेंद्रिय पदार्थ असतात.
महापालिकेने नागरिकांना अपील केले आहे की, कबुतरांच्या विष्ठेचा संपर्क टाळावा. सफाई करताना तोंडाला मास्क किंवा कपडा बांधावा आणि संरक्षक उपकरणे वापरावीत. प्रभावित भाग स्वच्छ करून निर्जंतुक करणे आवश्यक आहे.
महापालिकेचे आवाहन
कबुतरांना उघड्यावर किंवा इमारतींमध्ये खाद्य देण्यामुळे त्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे शहरातील आरोग्यविषयक समस्या गंभीर होत आहेत. म्हणून, नागरिकांनी सहकार्य करून उघड्यावर खाद्य टाकण्याचे टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
— पुणे महापालिका, आरोग्य विभाग