पुणे: अपघाताचा बहाणा अन् लूटमारीचा धंदा; कोंडव्यात मध्यरात्री नागरिक असुरक्षित!

Kondhwa-Police-Station-2.jpeg

पुणे प्रतिनिधी :
नागरिकांनो सावधान! पुणे शहरात रात्री-अपरात्री निर्मनुष्य रस्त्यांवरून प्रवास करणे आता जीवघेणे ठरत आहे. ‘गाडी नीट चालवता येत नाही का? आमच्या गाडीला कट मारलास, अपघात झाला आहे,’ अशा बनावट आरोपांच्या नावाखाली टोळक्यांकडून सर्रास लूटमार सुरू आहे. विशेष म्हणजे या टोळ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून हैदोस घालत असताना स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिनाभरात शहराच्या विविध भागांत घडलेल्या घटनांनी वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ ८ डिसेंबरला मध्यरात्री दुचाकीस्वार तरुणाला अडवून ‘गाडी चालवता येत नाही का?’ असा जाब विचारत दोन चोरट्यांनी तब्बल ३९ हजार ५०० रुपयांची रोकड लुटली. याच पद्धतीने १४ डिसेंबरला सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात अपघात झाल्याची बतावणी करत कारचालकाच्या गळ्यातील तीन लाखांची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली. नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी चोरटे मोकाटच फिरत असल्याचे वास्तव आहे.

हडपसरच्या मगरपट्टा रस्त्यावर ट्रकचालकाला अपघाताचा खोटा आरोप करत मारहाण करून पाच हजारांची लूट करणाऱ्या टोळीला अटक झाली खरी; मात्र प्रश्न असा आहे की, अशा किती टोळ्या अजून ‘अॅक्टिव्ह’ आहेत? महामार्गांपासून शहराच्या मुख्य रस्त्यांपर्यंत अवजड वाहनचालक, दुचाकीस्वार आणि कारचालक हे सगळेच या लुटारूंचे ‘सावज’ बनत आहेत.

‘अपघाताचे नाव आणि लूटमारीचा डाव’ हे सूत्र वापरून रात्रीच्या सुमारास पाठलाग, धमकावणे आणि लूटमार हे प्रकार वाढत असताना गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र प्रत्यक्षात रात्रपाळीतील पोलीस बंदोबस्त कागदोपत्रीच आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. एसीपी, डीसीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ड्युटीवर असली, तरी मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष पेट्रोलिंगला खरेच न्याय दिला जातो का?

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या गप्पा आणि प्रत्यक्षात नागरिकांची लूट – या विरोधाभासामुळे पुणेकरांमध्ये संताप वाढत आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी ‘अॅक्टिव्ह’ टोळक्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा ‘रात्रीचा पुणे’ नागरिकांसाठी नव्हे तर लुटारूंसाठीच सुरक्षित राहील, अशी कडू टीका आता उघडपणे व्यक्त होत आहे.

Spread the love

You may have missed